भुसावळात खड्ड्यांना बांगड्यांचा अहेर, नगरपालिका दवाखान्याला ठोकले कुलूप

भुसावळ शहरात संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन : नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

भुसावळ : भुसावळातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांची वाताहत झाली असून साधे पायी चालणेदेखील कठीण झाल्याने खड्डेमय रस्त्यांची तातडीने पालिका प्रशासन व सत्ताधारी नगराध्यक्षांनी डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून दुरुस्ती करावी अन्यथा बांगड्या भराव्यात, असा इशारा देत संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे यांच्या प्रमुख नेतृत्वात सोमवारी दुपारी शहरातील खड्ड्यांना बांगड्या वाहण्यात आल्या. शहरातील नगरपालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात रुग्णांना औषधी मिळत नाही शिवाय वेळेवर शवविच्छेदन केले जात नसल्याने यावेळी प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात येवून सत्ताधार्‍यांविषयी तीव्र रोष यावेळी करण्यात आला. सोनवणे यांच्या या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली.

आजी-माजी आमदारांमुळे शहराचा विकास खुंटला
शहरातील आजी-माजी आमदारांमुळे भुसावळ शहराचा विकास खुंटल्याचा आरोप याप्रसंगी जगन सोनवणे यांनी केला. शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेला नगराध्यक्ष रमण भोळे हेच जवाबदार असून विकासकामे करण्यात ते अपयशी ठरल्याने त्यांनी पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली. मागण्यांबाबत प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

या मागण्यांसाठी आंदोलन
भुसावळ शहरातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांच्या दुरवस्था झाल्याने काँक्रिटीकरण वा डांबरीकरण तातडीने करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, भुसावळ पालिका रुग्णालयात मृतदेहाचे तातडीने शवविच्छेदन होत नसल्याने मृतदेहाची होणारी हेळसांड थांबवून दोन डॉक्टरांची नियुक्ती करावी, रुग्णांना औषधांचा पुरवठा करावा, शिंदी येथील चार विधवा व निराधार महिलांना निलंबीत करण्यात आल्याने त्यांना तातडीने कामावर घ्यावे, प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासीक ग्राऊंडच्या नामांतरणानंतर 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाआधी नामकरणाचा फलक लावावा, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महर्षी वाल्मीकी यांचे पुतळे शहरात बसवावेत तसेच वरील मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको, रास्ता रोको तसेच जेलभरो, अर्धनग्न मोर्चा, इन्साफ मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यांचा आंदोलनात सहभाग
हे आंदोलनात संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे तसेच पीआरपी जळगाव जिल्हाप्रमुख पुष्पा जगन सोनवणे यांच्या प्रमुख नेतृत्वात व संविधान आर्मी प्रदेशाध्यक्ष राकेश बग्गन, आरीफ शेख, गोपी साळी, संगीता मोरे, मिलिंद भालेराव, संदीप मेंबर, इरफान शेख, शगीर शाह, रोशन शाह, मिराबाई जाधव, संगीता महाजन, मंदा केवलसिंग, नंदा सोनवणे, सचिन बारहे, तुषार चौधरी आदी सहभागी झाले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास साप्ताहिक आंदोलन छेडण्याचा इशारा ओडबसम क्रांती जिल्हाप्रमुख जयराम पुरभी, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हा उपाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.