भुसावळात खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात भाजयुमोने सोडल्या कागदी होड्या
भुसावळातील भाजपा सत्ताधार्यांना घरचा आहेर
भुसावळ : शहरातील रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण झाले असतानाच पावसामुळे खड्डेमय रस्ते आणखीनच बिकट झाल्यानंतरही सत्ताधारी व पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेवून असलेल्या जामनेररोडवरील मान रेसिडेंन्सीजवळ तुंबलेल्या पाण्यात कागदाच्या होडी सोडून भाजयुमोने सत्ताधारी भाजपाचा घरचा आहेर दिला. दरम्यान, एकीकडे सत्ताधारीच आंदोलन करीत असताना पालिकेतील विरोधी पक्ष मूग गिळून असल्याने नागरीकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
पालिका प्रशासन झोपेत
शहरातील जामनेर रोडसह व प्रमुख रस्त्यांची स्थिती अंत्यत बिकट आहे. मुरूमाचे टेंडर मंजूर झाल्यानंतरही पालिका प्रशासनासह सत्ताधार्यांकडून कुठलीही हालचाल होत नसल्याने जनभावना तीव्र झाल्या आहेत. झोपेचे सोंग घेतलेल्या पालिका प्रशासन व सत्ताधार्यांना जागी करण्यासाठी भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी खड्डेमय रस्त्यांमध्ये कागदाची होडी सोडून सत्ताधार्यांना घरचा अहेर देण्यात आला. भाजयुमोने यापूर्वीही दीप आमावस्येला शहरातील कचर्याच्या प्रश्नी पालिकेच्या प्रवेशव्दारासमोर दिवे लावून आंदोलन केले होते. दरम्यान, कागदाची होळी खड्डेमय रस्त्यावरील पाण्यात सोडताना भाजयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष अथर्व पांडे, गोपिसींग राजपुत, राहुल मेहरानी, अमित आसोदेकर, चेतन बोरोले, चिटणीस नागेश खरारे, चेतन सावकारे, मयुर अंजाळेकर, कोषाध्यक्ष देवेश कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत भट, सदस्य सागर महाजन, प्रणव डोलारे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.