भुसावळात खासदार राहुल गांधी यांची 12 रोजी सभा

0

जिल्ह्याच्या इतिहासात गांधी परीवाराची दुसरी सभा ; माजी खासदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ सभा

भुसावळ- रावेर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राषट्रवादीचे उमेदवार तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भुसावळात 11 किंवा 12 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जाहीर सभा होणार आहे. गांधी परीवाराने दुसर्‍यांदा जिल्ह्यात सभा घेण्याचा योग आला आहे. यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांनी विलास गरूड यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती हेदेखील विशेष !

प्रमुख पक्षांच्या गाजणार सभा
काँग्रेसतर्फे डॉ.पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क वाढवला असून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या गाठी-भेटीसोबत त्यांनी स्टार प्रचारकांच्या सभेचेही नियोजन केले आहे. भुसावळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 11 किंवा 12 रोजी राहुल गांधी यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व राज्यातील काँग्रेसचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. शिवाय प्रियंका गांधी यांचीदेखील सभा होण्याची दाट शक्यता असून त्यादेखील 18 एप्रिल रोजी सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सभेसाठी पालिकेकडे अर्ज
बुधवारी काँग्रेसचे माजी आमदार निळकंठ फालक व पदाधिकार्‍यांनी सभेसाठी मैदान मिळावे, म्हणून पालिकेकडे परवागनीचा अर्ज सादर केला आहे. 11 व 12 रोजी दोन्हींपैकी कुठलातरी एक दिवस सभेसाठी निश्‍चित केला जाणार आहे.