भुसावळात गहू तर चाळीसगावात तांदूळ साठा अधिक

0

जिल्ह्यात स्वस्त धान्यातील ‘मापात पाप उघड’ ; जिल्हाधिकार्‍यांच्या नोटीशीनंतर भुसावळात गोदामपालांची खालावली प्रकृती

भुसावळ– जिल्हाभरात शंभर कोटी रुपयांच्या झालेल्या अपहाराबाबत खुद्द राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दावा केल्यानंतर अन्न व पुरवठा गिरीश बापट यांनी गांभीर्याने दखल घेत जिल्हाभरात चौकशीचे आदेश दिले होते. राज्यस्तरीय समितीने सर्वच तालुक्यात गोदामांचा साठा तपासत गोपनीय अहवाल जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला. समजलेल्या माहितीनुसार चाळीसगावात 11 क्विंटल गहू कमी तर तांदळाचा साठा अधिक आढळला आहे तर सर्वाधिक चर्चेतील भुसावळात 191 कट्टे तांदळाचा साठा कमी आढळला असून 158 कट्टे गव्हाचा साठा मात्र जास्त आढळला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात दखल घेत जिल्ह्यातील दोषी गोदामपालांना नोटीसा बजावल्या तर भुसावळचे गोदामपाल डी.आर.जगताप यांना मिळताच त्यांचा गुरुवारी दुपारी एकला रक्तदाब कमी झाला त्यातच शुगरही वाढल्याने त्यांना तहसीलदारांच्या दालनातच भोवळ आली. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भुसावळातील घोटाळा सर्वाधिक
भाजपच्या जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी सर्वप्रथम भुसावळच्या शासकीय गोदामातील ‘मापातील पाप’ अर्थात गैरव्यवहार बाहेर काढून माजी मंत्री खडसे यांच्याकडे तक्रार केली होती तर खडसे यांनी गोदामाची स्पॉट व्हिजीट करीत वरणगावला पाठवण्यात येणार्‍या धान्यात प्रति क्विंटल 10 ते 12 धान्य कमी पाठवले जात असल्याचे उघड करून राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. याप्रसंगी खडसे यांनी गोदाम पालासह तहसीलदार, प्रांत आदींची झपाई करीत दोषींना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा दिल्याने अधिकार्‍यांना घाम फुटला होता. या सर्व प्रकाराचे खापर एकूणच गोदामपालावर फुटत असल्याने जगताप गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे बोलले जात आहे.