भुसावळात गावठी कट्ट्यासह दोघे संशयीत जाळ्यात

चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा ः बाजारपेठ व एलसीबी पथकाची कारवाई

भुसावळ : संघटीत गुन्हेगारी टोळीची दहशत टिकवून ठेवण्यासाठी संशयीत गावठी कट्ट्यांच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेसह बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर रविवार, 12 रोजी रात्री 1.45 वाजता संयुक्त कारवाईत दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर एक संशयीत पसार झाला. या प्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय प्रताप न्हावकर उर्फ थापा (24, चक्रधर नगर, भुसावळ) व रीतीक नरेश चौधरी (23, पंचशील नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर निलेश चंद्रकांत ठाकूर हा पोलिसांना पाहताच पसार झाला शिवाय अटकेतील आरोपींनी गावठी कट्टा व काडतूस निखील राजपूतने दिल्याची कबुली दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संघटीत टोळीद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
बाजारपेठ पोलिसांच्या माहितीनुसार, निखील राजपूतसह त्याच्या टोळीतील सदस्य टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी जमल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री 1.45 वाजेच्या सुमारास हनुमान नगराजवळील श्रीराम नगरात पोलिसांनी अचानक छापा टाकल्यानंतर निलेश चंद्रकांत ठाकूर हा पोलिसांना पाहताच पसार झाला तर अक्षय थापा तसेच रीतीक चौधरी यांना अटक करण्यात यश आले. अक्षय थापा याच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले तर रीतीकच्या ताब्यातून पाचशे रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. दोघा संशयीतांची सखोल विचारपूस केल्यानंतर त्यांनी गावठी कट्टा व काडतूस टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी निखील राजपूत याने दिल्याची कबुली दिली तसेच आणखी एक-एक कट्टा निखील राजपूतसह निलेश चंद्रकांत ठाकूर यांच्याकडे असल्याचीही कबुली आरोपींनी दिल्याने चौघा संशयीतांविरोधात एलसीबीचे नाईक रणजीत जाधव यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींना सोमवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रणजीत अशोक जाधव, नाईक किशोर राठोड, नाईक किरण धनगर, नाईक प्रमोद लाडवंजारी, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल मुरलिधर बारी तसेच बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, हवालदार विजय नेरकर, नाईक निलेश चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल सचिन पोळ, कॉन्स्टेबल जीवन कापडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व कॉन्स्टेबल योगेश महाजन करीत आहे.