भुसावळ : शहर गावठी पिस्टल विक्रीचे केंद्र ठरू पाहत असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शहरात गावठी पिस्टल आढळत असल्याने सुज्ञ नागरीकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा गोपनीय माहितीवरून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास यावल रस्त्यावरील फॉरेस्ट नाक्याजवळून संशयीत आरोपी सागर बापूराव सपकाळे (24, अंजाळे, ता.यावल) यास अटक केली असून संशयीताच्या ताब्यातून पिस्टल तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत. आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून केली कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक, हवालदार कमलाकर बागुल, नाईक दादाभाऊ पाटील, चालक प्रवीण हिवराळे आदींनी एक संशयीत गावठी कट्ट्यासह यावल रोडवरील फॉरेस्ट नाक्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला होता. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सागर सपकाळे आल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या अंग झडतीत 30 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे व मेड इन युएसए 32 एमएम लिहिलेले पिस्तुल तसेच दोन हजार पाचशे रुपये किंतमीचे पाच जिवंत काडतूस आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.