भुसावळात गोदामाअभावी रखडली ज्वारी-मका खरेदी

0

31 डिसेंबर अखेरची मुदत ; मुदत वाढीबाबत पदाधिकार्‍यांचे निवेदन

भुसावळ- गोदामाअभावी शासकीय ज्वारी-मका खरेदी केंद्रास भुसावळात विलंब होत असून 31 डिसेंबर ही अखेरची मुदत असतानाही खरेदी होत नसल्याने युवा कार्यकर्ते व कृउबा संचालक सचिन चौधरी यांच्या नेतृत्वात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देवून खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनाचा आशय असा की, शासनाने भुसावळात शासकीय ज्वारी-खरेदी केंद्राला मंजुरी दिली असून 300 शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे तर शेतकी संघ त्यासाठी नोडल एजन्सी आहे. डिसेंबर महिन्यात शासकीय सुट्या मोठ्या प्रमाणावर असून शेत मालाचे मोजमाप होण्यास अडचणी येणार आहेत. तातडीने खरेदी केंद्र सुरू करावे तसेच खरेदीची मुदत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी कृउबा संचालक सचिन चौधरी, अशोक पाटील, गजानन सरोदे, राजेंद्र जोशी, सोपान भारंबे, कैलास गव्हाणे, नारायण सपकाळे, एस.आर.पाटील, शेतकी संघ चेअरमन पंढरीनाथ पाटील, अण्णा शिंदे आदींची उपस्थिती होती.