भुसावळ : भुसावळातील गोळीबाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच या गुन्ह्यातील संशयीत आरोपी असलेल्या खरात भावंडांच्या घरातून पोलिस तपासादरम्यान तीन गावठी कट्ट्यांसह एक छर्र्याची बंदुक जप्त करण्यात आली आहे तर या गुन्ह्यातील अन्य खडक्यातील संशयीत आरोपीच्या ताब्यातूनही एक कट्टा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, शहरात सातत्याने जप्त होणारे कट्टे पाहता पोलिस प्रशासनाने वेळीच गुन्हेगारी थोपवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गोळीबाराने हादरले होते भुसावळ
शहरातील आंबेडकर नगरातील 19 वर्षीय आदित्य लोखंडे या तरुणावर गुरुवार, 9 जुलै रोजी कब्रस्थानात गोळीबार झाला होता. या प्रकरणी खरात भावंडासह सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होवून आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींनी लोखंडेवर ज्या गावठी पिस्तूलातून गोळी झाडले ते 10 जुलै रोजी जप्त करण्यात आले तर खडका येथील रोशन सपकाळे याच्याकडून 11 जुलै रोजी पुन्हा एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले शिवाय नगरसेवक राजकुमार खरात यांच्या घरातून सोमवारी पुन्हा दोन गावठी पिस्तूल जप्त व एक छर्र्याची बंदूक जप्त करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.