भुसावळात घरगुतीचे गॅसचे अवैधरीत्या वाहनात रीफिलिंग : तिघांना अटक
आयजींच्या पथकाची कारवाई : एक लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील पटेल कॉलनीत अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनात भरला जात असल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अचानक धाड टाकत दोन रीक्षा चालकांसह अवैधरीत्या रीफिलिंग करणार्याच्या मुसक्या आवळल्या. नऊ सिलिंडरसह दोन रीक्षा व अन्य मुद्देमाल मिळून एक लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींना केली अटक
अवैधरीत्या गॅस वाहनात भरणार्या सलमान अब्दुल माजीद पटेल (30, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) तसेच रीक्षा चालक आरीफ खान इसाफ खान (35, जाम मोहल्ला, भुसावळ) व जकाउल्ला खान असदउल्ला खान (43, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. पथकाने घटनास्थळावरून दोन रीक्षा (एम.एच.19 सी.डब्ल्यू.1783), (एम.एच.19 सी.डब्ल्यू.0236), नऊ गॅस सिलिंडर, कॉम्प्रेसर मशीन आदी मिळून एक लाख सहा हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीनही संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर गुलाब तडवी, रामचंद्र बोरसे, नाईक नितीन सपकाळे, नाईक प्रमोद मंडलिक, नाईक मनोज दुसाणे, चालक सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने केली.