भुसावळात घरफोडीतील आरोपी जाळ्यात : झटापटीदरम्यान कट्टा जमिनीवर पडल्याने गोळीबार

0

सुदैवाने कुणीही जखमी नाही : कुविख्यात आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळातील खडका रोड भागातील 15 लाखांच्या घरफोडीप्रकरणातील पसार असलेले दोन अट्टल आरोपी शहरातील जाम मोहल्ला भागात आल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला मात्र आरोपींना पोलिस आल्याची कुणकुण लागल्याने त्यांनी पोलिसांसोबतच झटापट केल्यानंतर आरोपीच्या कमरेला लागलेला कट्टा जमिनीवर पडल्याने गोळीबार झाला मात्र सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. रविवारी दुपारी साडेतीन वाजता झालेल्या या थराराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

गोळीबाराने पुन्हा हादरले भुसावळ
शहरातील यापूर्वीच्या अप्रिय घटनांचा आलेख पाहता गोळीबार व खून शहरवासीयांसाठी नवीन नाहीत मात्र रविवारी थेट आरोपी व पोलिसांमध्येच झडप होवून कट्टा जमिनीवर पडून गोळी चालल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी अल्तमश रशीद शेख (21, रा.जाम मोहल्ला, भुसावळ)व जहीर सलीमोद्दीन सय्यद (19, रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वी रेल्वेत चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आरोपींच्या ताब्यातून पिस्टल (कट्टा) व चाकू जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, नाईक किशोर महाजन, समाधान पाटील, रमण सुरळकर, रवींद्र बिर्‍हाडे, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देखमुख, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.