भुसावळात घरफोडीतील आरोपींची ओळख परेड

चांगल्या वर्तनाची समज : पोलिसांनी नोंदवली दिनक्रमाची माहिती : पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरेंनी केली चौकशी

भुसावळ : भुसावळ विभागातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांतील संशयीतांची पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी जुन्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात ओळख परेड घेतली. याप्रसंगी संशयीत आरोपींना पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता समाजाच्या प्रवाहात येवून चांगले वर्तन करण्याची समज वाघचौरे यांनी दिली.

21 आरोपींची केली चौकशी
ओळख परेडमध्ये उपविभागातील भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे सात, बााजरपेठचे सात तसेच तालुका पोलीस ठाण्याचे सात असे एकूण 21 रेकॉर्डवरील आरोपी बोलावण्यात आले. ओळख परेड दरम्यान त्यांची सविस्तर विचारपूस करण्यात आली त्याशिवाय सद्यस्थितीमध्ये सदरचे आरोपी काय करतात? कोणते वाहन वापरतात? कोणता मोबाईल वापरतात? आदी बाबींची सविस्तर माहिती नोंदविण्यात आली तसेच त्यांचे इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. उपअधीक्षक वाघचौरे यांनी आरोपींना प्रंसगी चांगल्या वर्तनाची समज दिली. प्रसंगी 110 अन्वये उभयंतांवर कारवाई करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व तीनही पोलीस ठाण्यातील अंमलदार प्रसंगी उपस्थित होते.