भुसावळात घराला भीषण आगीत वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर

भुसावळ : शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाजवळील महेश कॉलनी परीसरातील एका फ्लॅटला शनिवार, 26 मार्च रेाजी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली व कुटुंब गाढ झोपेत असतानाच आगीचा विळखा पसरल्याने 55 वर्षीय कुटुंबप्रमुखाचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर त्यांचा 32 वर्षीय मुलगा आगीत गंभीर जखमी झाला आहे. पहाटेच्या सुमारास आग लागल्याचे कळताच रहिवाशांनी धाव घेवून आग विझवण्याचा प्रयत्न केला तर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले.

पहाटेच्या सुमारास लागली आग
नाहाटा महाविद्यालयाजवळील महेश कॉलनीतील निकुंज अपार्टमेंटमध्ये दुसर्‍या मजल्यावर केशवाला वाधवाणी हे आपल्या कुटुंबासह राहतात. शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून आरोळ्या ऐकू होत्या तर आगीच्या ज्वाला बाहेर पडताच रहिवाशांनी लागलीच धाव घेवून मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरीकांनी तातडीने अग्नीशामन दल आणि बाजारपेठ पोलिसांना माहिती सूचित केली तर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले मात्र या आगीत केशवलाल वाधवाणी (55) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले तर त्यांचा 32 वर्षीय मुलगा लखन वाधवाणी हा गंभीररीत्या होरपळला. त्याला उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

नागरीकांची मदत कार्यासाठी धाव
माजी नगरसेवक महेंद्रसिंह उर्फ पिंटू ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. वाधवानी कुटुंबात चार जण राहत असून ही आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही.