भुसावळात चाकूचे वार करून भावाचाच खून

0

किरकोळ कारणावरून दोघा भावांमध्ये मतभेद टोकाला ; भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागात खळबळ

भुसावळ- मद्यधूंद अवस्थेत भावाशीच वाद उफाळल्याने लहान भावाने संतापाच्या भरात मोठ्या भावावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना 8 रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास शहरातील गंगाराम प्लॉटमध्ये घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत वाहन चालक योगेश प्रल्हाद पाटील (32) यांचा मृत्यू ओढवला असून या प्रकरणी मयताचा लहान भाऊ स्वप्निल प्रल्हाद पाटील (28, खडका रोड, बजाज बिल्डींग शेजारी, भुसावळ) यास अटक करण्यात आली आहे.

खुनानंतर आरोपीने स्वतःच दिली माहिती
गंगाराम प्लॉटमधील रहिवासी असलेल्या योगेश पाटील यांच्याकडे त्यांचा लहान भाऊ स्वप्नील हा शुक्रवारी रात्री मद्यधूंद अवस्थेत धडकला. यावेळी योगेश यांनीदेखील मद्य सेवन केल्याने दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला मात्र मद्याच्या नशेमुळे हा वाद आणखीनच विकोपाला गेला. यावेळी संतापाच्या भरात स्वप्नील घरातील चाकूने योगेशच्या गळ्यावर व गालावर सपासप तीन वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. शनिवारी पहाटे 12.30 ते एक वाजेदरम्यान ही घडना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला भाऊ पाहून आरोपी स्वप्नीलची भंबेरी उडाली व त्याने घटनास्थळी पडलेली रक्त पुसण्याचा प्रयत्न करीत पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वप्नील पायी चालत पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहोचला व त्याने भावाने स्वतःवर चाकूने वार करून जखमी करून घेतल्याची खोटी माहिती दिली. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नीलला गोदावरी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

पोलिस चौकशीत आरोपी केला गुन्हा कबुल
स्वप्नील व मयत योगेश यांना दारूचे प्रचंड व्यसन असल्याने या कारणाने दोघांच्याही पत्नी माहेरी निघून गेल्याचे सांगण्यात आले. दोघाही भावांचे पितृछत्र हरवले असून त्यांची आई रेल्वेत सेवेत आहे. मोठ्या भावाची पत्नी घरातून निघून गेल्याने तिला शोधण्यासाठी तिची सासूही बाहेरगावी गेल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले तर बहुधा याच कारणातून दोघा भावंडामध्ये वाद उफाळल्यानेच लहान भावाने मोठ्या भावाला चाकू मारल्याचा कयास आहे. आरोपीला बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा
मयत योगेश याचा मृतदेह नगरपालिका रुग्णालयात आणून डॉ.एस.डी.इंगळे यांनी शवविच्छेदन केले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र पोलिस या प्रकरणात स्वतः फिर्यादी झाले असून उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पहाटे खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार, उपनिरीक्षक मनोज ठाकरे, दत्तात्रय गुळिंग व सहकार्‍यांनी धाव घेतली.