भुसावळ : कन्नड तालुक्यातील प्रवाशास चाकूच्या धाकावर मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना 21 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता नाहाटा चौफुलीजवळ घडली होती. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होता तर यातील तस्लीम काल्या हा कुविख्यात गुन्हेगार पसार झाला होता. त्यास शुक्रवारी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार सागर सुभाष बारगळल (26, रा.मुंडवाडी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) हे गावी जाण्यासाठी 21 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता नाहाटा चौफुलीकडून जात असताना तीन अज्ञातांनी बाळगळल यास हॉटेल हेवनजवळ नेवून चाकूच्या धाकावर सहा हजारांचा मोबाईल तसेच एक हजार 700 रुपये लुटून पोबारा केला होता. या गुन्ह्यात सुरुवातीला समीर शेख (मुस्लीम कॉलनी) यास अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या चौकशीत तस्लीम काल्याचे नाव उघड झाले होते तर आणखी एक संशयीताचे नाव निष्पन्न करणे बाकी आहे. संशयीत आरोपी शेख तस्लिम शेख सलीम (22, रा.दीनदयाल नगर) हा घोडेपीर बाबा दर्गा भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, नाईक रमण सुरळकर, विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे, सुभाष साबळे आदींनी केली. तपास सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी व सुभाष साबळे करीत आहेत.