भुसावळात चाकूच्या धाकावर एकास लुटले : आरोपी जाळ्यात

0

भुसावळ- जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीजवळ चाकूच्या धाकावर एकास लुटल्याची घटना 11 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पसार आरोपीच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अजय डिगंबर जाधव (24, रा.खालची पेठ, भडगाव, ह.मु.दिनदयाल नगर भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

चाकूहल्ला करीत रक्कम लांबवली
तक्रारदार सुनील बाजीराव कोळी (35, रा.तळवेल, ता.भुसावळ) हे नाहाटा चौफुलजवळील पेट्रोल पंपाच्या बाजुला लघूशंकेसाठी गेल्यानंतर आरोपी अजय जाधवने चाकु लावुन शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत शर्टाच्या खिशातून तीन हजार 200 रुपये काढल्यानंतर तक्रारदाराने त्यास प्रतिकार केल्यानंतर आरोपीने चाकूने फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या बरगडीत व उजव्या पायाच्या मांडीमागे व उजव्या हाताच्या पंज्याच्या मधल्या बोटाला हल्ला करीत पळ काढला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. आरोपी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता नाहाटा चौफुलीजवळ आला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक महेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींनी आरोपीला अटक केली. तपास सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत. दरम्यान, अटकेतील आरोपी हा कुविख्यात असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी बाजारपेठ पोलिसात लूट केल्याचे गुन्हे दाखल आहेत.