भुसावळ- हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दोन वेळा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एकाच्या पोटावर चाकू हल्ला केल्याची घटना पीओएच कॉलनीजवळील ज्ञानेश्वर वाघ यांच्या घराजवळ गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री दहा वाजता पीओएच कॉलनीत तक्रारदाराचा मित्र ज्ञानेश्वरचा भाऊ दीपक वाघच्या लग्नाच्या हळदीनिमित्त कार्यक्रम सुरू असताना गाणे असताना नाचताना धक्का लागल्याने सुनील भीमराव सोनवणे (तापीनगर, सुभाष चौक, भुसावळ) यांच्याशी संशयीत आरोपी हर्षल सुनील जाधव (चांदमारी चाळ, भुसावळ) व सागर रेवाराम कहार (श्री संत गाडगेबाबा हिंदी हायस्कूलजवळ, भुसावळ) यांचा वाद झाला व आरोपी हर्षल जाधवने त्याच्याजवळील चाकू सुनील सोनवणे यांच्या पोटावर डाव्या बाजूला मारल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने हळदीच्या कार्यक्रमात खळबळ उडाली. सोनवणे यांच्यावर जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. शुक्रवारी रात्री 10 वाजता शहर पोलिसात दोघा संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहम्मद अ.सैय्यद करीत आहेत.