हुडको कॉलनीत थुंकल्याचा वाद गेला विकोपाला ; एका आरोपीला न्यायालयाने सुनावली एका दिवसाची पोलिस कोठडी
भुसावळ- रस्त्याने जाताना थुंकल्याचा राग येवून झालेल्या वादानंतर युवकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील हुडको कॉलनी भागात बुधवारी रात्री 9.30 वाजता घडली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात महिलेसह युवकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला तर अटकेतील एका संशयीतास न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, शहरात चोर्या-घरफोड्या तसेच खुनांच्या सत्रापाठोपाठ चाकू हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी रोखण्यासाठी धडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार
रोहित दीपक बाविस्कर (19) हा युवक हुडको कॉलनीतून जात असताना रस्त्यात थुंकल्याने त्याचा राग येवून संशयीत सेवक उत्तम कोळी याने ‘मला पाहून का थुंकला’ असे म्हणत वाद घातला. ही घटना बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने संशयीत सेवक याने त्याच्या जवळील चाकूने रोहितवर चाकू हल्ला केला. यात रोहितच्या मांडीवर चाकूचे वार करण्यात आल्याने रोहित जखमी झाला. पोलिसांनी रात्रीच जखमी रोहितला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेमो दिल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकू हल्ल्याची घटना कळताच पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सय्यद वली, संजय पाटील, भूषण चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संशयीत घरी असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने त्याच्या घरी जात त्याला अटकअटक केली. यात सेवक यांच्या आईनेही जखमीला मारल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गुरूवारी आरोपी सेवकला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.