नाहाटा चौफुलीवरील घटना ; तीन संशयीत पसार
भुसावळ: लघूशंकेसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नाहाटा चौफुलीवर थांबलेल्या 29 वर्षीय इसमावर तोंडाला बांधून आलेल्या तिघांनी चाकू हल्ला करीत लूट करण्याचा प्रयत्न केला मात्र पैसे देण्यास नकार देणार्या इसमाच्या बरगडीवर पोटावर व दंडावर चाकूचे सपासप वार करून संशयीत आरोपी पसार झाले. ही घटना मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाजवळ घडली. या हल्ल्यात तक्रारदार दत्तात्रय वसंत पाटील (29, तापी नगर, हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले. 26 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ते लघूशंकेसाठी थांबले असताना संशयीत आरोपींनी त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये लूटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी नकार दिल्याने आरोपींनी चाकूने हल्ला चढवला. बाजारपेठ पोलिसात अज्ञात 25 ते 30 वयोगटातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून जखमी पाटील यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुन्ह्यातील एक संशयीताची ओळख पटल्याची माहिती असून त्याच्या अटकेसाठी पथक रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.