भुसावळ- शहरात साडेचार लाखांची रक्कम पकडल्याची घटना जाती असताना पुन्हा दोन लाखांची रोकड पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे तर ही रक्कम कामगारांच्या वेतनाची असल्याचा खुलासा संबंधित गाडी मालकाने केला असून प्रशासनाकडून या बाबीची खातरजमा केली जात आहे. सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शहरात येत असलेल्या डस्टर (एम.एच.19 बी.यु.7695) ची पथकाने तपासणी केली असता त्यात एक लाख 97 हजार 500 रुपये आढळल्यानंतर गाडी चालक विलास जयराम पाटील (रा. शांतीनगर, भुसावळ) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कामगारांचे वेतन करायचे असल्याने रक्कम सोबत असल्याचा खुलासा पथकाला दिला.
जप्त रक्कम ट्रेझरीत जमा
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महसूल व पोलिस विभागाच्या पथकने वरणगाव रोडवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केल्यानंतर डस्टर वाहनातून रक्कम ताब्यात घेत ती शासकीय ट्रेझरीत जमा केली. ही कारवाई पथक प्रमुख एम.आर.दुसाने, पदमाकर महाजन व त्यांच्या सहकार्यांनी केली. प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार महेद्र पवार यांना याबाबतची माहिती कळवण्यात आली.