भुसावळात चार दुकानांना ठोकले सील

0

भुसावळ : भुसावळात अडीचशे पार गेलेली रुग्ण संख्या, 30 रुग्णांचा आतापर्यंत झालेला मृत्यू व सातत्याने वाढत असलेला फैलाव आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरीक व व्यापार्‍यांना नियम पाळण्याचे आवाहन केल्यानंतरही नियमांना हरताळ फासली जात असल्याने पालिका प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून धडक कारवाई केली जात आहे. मंगळवारीदेखील सोशल डिस्टन्स न पाळणार्‍या आठ फळ विक्रेत्यांचे साहित्य जप्त करून हातगाड्या जप्त करण्यात आल्या तसेच आस्थापनेवरील 50 टक्क्यांपेक्षा अधिक कामगार कामावर असल्याने चार दुकानांना सील ठोकण्यात आल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

आठ हातगाड्या जप्त
पालिकेच्या पथकाने आठवडे बाजार भागात एकाच ठिकाणी फळ गाड्या लावणार्‍या आठ विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडील साहित्य तसेच हातगाड्या पालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून जप्त केल्या. फळ विक्रेत्यांना एकाच जागी उभे राहण्यास (मुव्हमेंट) परवानगी नाकारण्यात आली आहे शिवाय सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मात्र नियम न पाळण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच आस्थापनेवर मंजूुर कर्मचारी संख्यपेक्षा 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी कामावर ठेवावेत, असे व्यापार्‍यांच्या बैठकीत ठरल्यानंतरही दुकानदारांनी नियम न पाळल्याने शहरातील मनीष मॉल, बिसमिल्ला प्रोव्हीजन, नमस्ते ऑटोमोबाईल, श्री बाईक हाउस या दुकानांना सील ठोकण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धीवरे, प्रभारी मुख्याधिकारी किरण पाटील, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरीषदेचे अभियंता पंकज पन्हाळे, सुरज नारखेडे, संजय बाणाईते, चेतन पाटील, राजीव वाघ, महेश चौधरी, राजू पाटील, विजय राजपूत, कृष्णा पाटील, किरण मंदवाडे, राजू नाटकर, कॉन्स्टेबल दीपक शिंदे आदींच्या पथकाने केली.