भुसावळात चोरटे मुक्कामी : पुन्हा धाडसी घरफोडी

0

दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला ; पोलिसांची गस्त कुचकामी

भुसावळ- शहरात चोरट्यांनी पोलिसांच्या अस्तित्वालाच आव्हान देत चोर्‍यांसह घरफोड्यांचा धमाका लावला आहे. गुन्हेगारांनी भर दिवसा तलवार घेवून हल्ला चढवण्यासह मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या असताना मुक्कामी असलेल्या चोरट्यांकडून सातत्याने घरफोड्या सुरू असल्याने नागरीक धास्तावले आहेत. शहरातील रींग रोड, पटेल कॉलनीतील रहिवासी नोकरीनिमित्त सुरतला कुटुंबासह गेल्याने चोरट्यांनी संधी साधत दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झालला नव्हता.

सोन्याच्या हारसह रोकड लांबवली
समजलेल्या माहितीनुसार, पटेल कॉलनीतील रहिवासी अक्षय राजेंद्र रोकडे यांना सुरतमध्ये नोकरी लागल्याने ते मोठ्या भावासह आईला घेवून 15 दिवसांपूर्वी रवाना झाले होते. राहत्या घराच्या कपाटात मात्र आईचा सुमारे सहा तोळे वजनाचा हार व 25 हजारांची रोकड तशीच ठेवून रोकडे कुटुंब सुरतला रवाना झाले. चोरट्यांनी ही संधी साधत दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत ऐवजावर डल्ला मारला तसेच कपाटातील सामानासही फ्रीजमधील साहित्यही फेकत पोबारा केला. मंगळवारी सकाळी रहिवाशांना घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली. उपनिरीक्षक मनोज ठाकरे, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, किशोर महाजन आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, घरमालक आल्यानंतर नेमका काय ऐवज गेला? याची माहिती घेवून गुन्हा दाखल होईल, असे पोलिसांनी सांगितले.

चोर्‍या-घरफोड्या वाढल्या
गत आठवड्यातील बुधवार, 22 मे रोजी शहरातील श्रीराम हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी अरुणा रडे या गावात असलेल्या माहेरी गेल्याने चोरटयांनी संधी साधत लोखंडी दरवाजाला खालच्या बाजूने वाकवत लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील पाच तोळ्याचे दागिने व दोन हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबवला होता. एक लाख 44 हजार रुपयांच्या घरफोडीसह यापूर्वी झालेल्य अन्य चोर्‍या-घरफोड्यांची उकल होत नसल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे.