भुसावळात चोरटे सैराट ; पुन्हा धाडसी घरफोडी

0

श्रीराम हौसिंग सोसायटीतील बंद घर हेरत दिड लाखांच्या मुद्देमालावर डल्ला ; पोलिसांची गस्त ठरतेय कुचकामी ; नागरीकांमध्ये भीती

भुसावळ- धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्यासह बसमधून सव्वा लाखांचे दागिने लांबवण्याच्या घटना ताज्या असतानाच शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील श्रीराम हौसिंग सोसायटीत बंद घराला हेरून चोरट्यांनी सुमारे दिड लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास लागत नसतानाच नव्याने होणार्‍या चोर्‍या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे तर पोलिसांची गस्त भेदून मुक्कामी असलेले चोरटे कामे फत्ते करीत आहेत. नागरीकांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचना द्यावी तसेच मौल्यवान दागिन्यांसह जास्तीची रोकड घरात ठेवू अये, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.

बंद घराला केले टार्गेट
शहरातील श्रीराम हौसिंग सोसायटीतील रहिवासी अरुणा रडे या गावातच जुना सतारा भागात माहेरी बुधवारी गेल्याने घराला कुलूप होते. ही बाब चोरट्यांनी हेरत घराला असलेल्या दोन दरवाजांपैकी एका चेन गेटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले तसेच मुख्य दरवाजाआधी असलेल्या लोखंडी दरवाजाला खालच्या बाजूने वाकवत लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवला. घरातील कपाटात पाच तोळ्याचे दागिणे व दोन हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबवला तसेच कपाटातील सामान बेडरूममध्ये अस्ताव्यस्त फेकला चोरट्यांनी पळ केला. एक लाख 44 हजार रूपयांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी रडे यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडीनंतर पोलिसांनी घेतली धाव
घरफोडीनंतर डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांच्यासह डीबी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. जळगावच्या श्‍वानाने घराच्या समोरील मोकळ्या जागेपर्यंत चोरट्यांचा माग काढला मात्र श्‍वान तेथेच घुटमळले. दरम्यान, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.