भुसावळ : यावल तालुक्यातील पाडळसा येथील इसमाची भुसावळ शहरातून 28 ऑक्टोबर रोजी दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू असताना शहरातील खडका रोड भागातील मुस्लीम कॉलनीत एक संशयीत दुचाकी विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी संशयीताच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याने भुसावळातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. मुकूंद डिगंबर सुरवाडे (रा.वाघनगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिसात आर्म अॅक्ट तसेच दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
गोपनीय माहितीवरून अटक
पाडळसा येथील वसंस रामा भोई हे भुसावळात आल्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी त्यांची दुचाकी (एम.एच.19 सी.जी.9534) क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याने त्यांनी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. बाजारपेठ पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुरूवारी सकाळी 10.30 वाजता खडका रोड, मुस्लीम कॉलनी भागात एक संशयीत दुचाकी विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याने भुसावळातील आठवडे बाजारातून दुचाकी चोरल्याची कबुली देत भुसावळात ही दुचाकी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक नेव्हील बाटली, रवींद्र बिर्हाडे, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे, होमगार्ड शक्तीसिंग चंदेले आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस नाईक दीपक जाधव करीत आहेत.