भुसावळात छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याने खुलले रेल्वे स्थानकाचे सौंदर्य

0

11 फूट उंचीच्या पुतळ्याची मध्यरात्री स्थापना ; पुतळा पाहणीसाठी दिवसभर शिवप्रेमींनी केली गर्दी

भुसावळ- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शनिवारी असलेल्या जयंतीदिनीच रेल्वे स्थानकावर महाराजांचा 11 फूट उंचीचा पुतळ्याची मध्यरात्री स्थापना झाल्याने भुसावळकरांना जयंतीला अविस्मरणीय भेट मिळाली. दिवसभर महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. भुसावळ रेल्वे स्थानकाचा कायापालट होत असताना स्थानकाबाहेर असलेल्या छत्रपतींचा अर्धाकृती पुतळा स्थलांतरीत करण्याच्या सूचना डीआरएम आर.के.यादव यांनी पुतळा स्थापन व देखभाल समितीस दिल्या होत्या. शनिवारी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीसाठी आणलेला अश्‍वारूढ पुतळाच नियोजित जागेवर मध्यरात्री क्रेनच्या सहाय्याने बसवण्यात आल्याने शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांचा जयघोष केला.

रेल्वे स्थानकाचे खुलले सौंदर्य
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या परीसरात विविध विकासकामे सुरू आहेत. यापूर्वीच रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागावर शंभर फूटावरील तिरंगा, कारंजे तसेच रणगाडा ठेवण्यात आल्याने रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात वाढ झाली आहे शिवाय काही अंतरावर हेरीटेजचेही काम सुरू असतानाच रेल्वे स्थानकाबाहेर छत्रपती शिवरायांचा 11 फूट 22 इंच उंचीचा पुतळा शनिवारी मध्यरात्री बसवण्यात आल्याने भुसावळकर सुखावले आहेत. लोकवर्गणीतून या पुतळ्याची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रेल्वे स्थानकाबाहेर असलेला अर्धाकृती पुतळा काढल्यानंतर तो पुन्हा स्थलांतरीत करताना तो तुटण्याची भीती असल्याने समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव हिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमधील सदस्यांनी रात्री दोनला मिरवणुकीसाठी आणलेला अश्‍वारूढ पुतळा कायमस्वरूपी स्थापीत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी वामन महाजन आणि त्यांचा मुलगा गोकुळ महाजन व अक्षय चोरडिया व मुर्तीकार रवींद्र यांनी विशेष सहकार्य केले.

पुतळ्यासाठी देखभाल समिती
पुतळ्याच्या देखभालीची जवाबदारीसाठी देखभाल समिती नेमण्यात आली आहे. अध्यक्ष लक्ष्मणराव हिंगणे, उपाध्यक्ष आमदार संजय सावकारे, सचिव समकित सुराणा, कोषाध्यक्ष निर्मल कोठारी, सदस्य तथा नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, रवींद्र लेकुरवाळे, मनोज बियाणी, रवींद्र ढगे व कार्यकारी सदस्य रीतेश जैन, प्रचार सदस्य उमाकांत शर्मा, वामन महाजन (राजपुत) यांचा समावेश आहे.

शहराच्या सौंदर्यात वाढ -आमदार संजय सावकारे
भुसावळ रेल्वे स्थानक परीसरात छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा बसवण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे. रेल्वे प्रशासनाला या संदर्भात आपण वैयक्तिकरीत्या पुतळा बसवू देण्यासंदर्भात विनंती केली होती, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.