भुसावळात जनावरांची निदर्यतेने वाहतूक ; तिघांना अटक

0

भुसावळ- मध्यप्रदेशातून कत्तलीच्या इराद्याने अत्यंत निदर्यतेने म्हशींची वाहतूक केली जात असताना बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत 13 म्हशींसह एका रेड्याची सुटका केली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 12.50 वाजता जामनेर रोडवरील बियाणी स्कूलसमोर ही कारवाई करण्यात आली तर जनावरांना जळगावच्या गो शाळेत रवाना करण्यात आले. या प्रकरणी मध्यप्रदेशातील तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
आयशर ट्रक (एम.पी.09 जी.जे.7337) मध्ये गुरांची निदर्यतेने वाहतूक होत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 12.50 वाजेच्या सुमारास बियाणी स्कूलजवळ वाहन अडवून कागदपत्रांची मागणी केल्यानंतर उभयंतांकडे कागदपत्रे नसल्याने संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. वाहनातील 13 म्हशींसह एका रेड्याची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली तर या प्रकरणी हवालदार सुनील जोशी यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी तथा वाहन चालक फिरोज मो.मेहबूब (24, बांडावस्ती, महू, मध्यप्रदेश), राजू शेख रूस्तम शेख (45, ग्राम नागदा, देवास, मध्यप्रदेश) व सुफियान मो.नवाज (30, महू, इंदौर, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. चार लाख 20 हजार रुपये किंमतीच्या म्हशींसह तीन लाख रुपयांचे आयशर वाहन मिळून सात लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.