भुसावळात जबरी घरफोडी; दीड लाखाचा ऐवज लंपास

0

भुसावळ । शहरातील शांतीनगर परिसरातील शिक्षक कॉलनीत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा 1 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवार 23 रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. शिक्षक कॉलनीतील विजय मनोहर गाजरे यांच्या घराच्या किचनकडील दरवाजाचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील गोदरेज कपाटातील 55 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 30 हजार रुपयांचे सोन्याचे मनी, वाट्या असलेली पोत, 25 हजाराची रुपयांची एक तोड्याची सोन्याची अंगठी, 28 हजाराची 11 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 20 हजार रुपये रोख रक्कम यासह मोटारसायकल व गॅसचे कागदपत्र असा एकूण 1 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

याप्रकरणी विजय गाजरे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय विशाल पाटील करीत आहे.