भुसावळात जबरी लूट : तिघे आरोपी जाळ्यात

गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह लुटलेला मोबाईल व डेबीट कार्ड जप्त

भुसावळ : शहरातील सुंदर नगराजवळ युवकाला मारहाण करीत त्याच्याकडील 30 हजारांच्या रोकडसह 15 हजारांचा मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना शनिवार, 6 मार्च रोजी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच लुटलेला मोबाईल व डेबीट कार्ड जप्त करण्यात आले आहे. मो.सोहेल मो.इसाक (21, मुस्लीम कॉलनी, ईदगाहच्या पाठीमागे, भुसावळ), फरहान रोशन खान (22, मोहम्मदी नगर, अलहिरा स्कूलजवळ, भुसावळ) व सोमेश दिलीप तावरे (22, लक्ष्मीनगर, रींग रोडजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

दुचाकी थांबताच केली होती मारहाण
बर्‍हाणपूर जिल्ह्यातील लोणी येथील रहिवासी पराग प्रल्हाद चौधरी यांच्या वडीलांवर शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याने वडीलांसाठी जेवणाचा डबा घेण्यासाठी तो शनिवारी रात्री छायादेवी राका नगरात राहणार्‍या बहिणीकडे दुचाकी (क्र.एम.एच.19-7712) ने जात असताना वाटेत सुंदर नगरजवळ मोबाईल वाजल्याने तो थांबला. त्याचवेळी चार अज्ञात संशयीतांनी त्याच्या डोक्यावर वार केला त्यामुळे अर्धवट बेशुद्ध होताच संशयितांनी परागच्या खिशातून पाकिट व मोबाईल काढून घेतले. पाकिटात 30 हजार रुपये, एटीएम, कागदपत्रे, व्हीजिटींग कार्ड होते.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, योगेश चव्हाण, गजानन वाघ, सुभाष साबळे, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.