भुसावळात जलवाहीनीला गळती : हजारो लीटर पाण्याची नासाडी

0

लक्ष्मीनगरासह नारायण नगर भागात रस्त्यांचीही समस्या बिकट

भुसावळ- शहराच्या विविध भागातील नागरीकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे तर काही भागात पालिकेच्या जलवाहीनीला लागलेल्या गळतीमुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर येत असल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील लक्ष्मी नारायण नगर व मंगल शारदा कॉलनी परीसरातील जलवाहिनीचा समावेश असून रविवारी जलवाहीनीला लागलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

एकीकडे झळा दुसरीकडे नासाडी
शहरातील नागरीकांना पावसाळ्याच्या दिवसातही आठ ते दहा पाणीपुरवठा होत असून होणारा पाणीपुरवठाही अल्पशा प्रमाणात होत असल्याने रहिवाशांना पाण्याच्या समस्येला तोेंड द्यावे लागत आहे. शहरातील पालिका प्रशासनाच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. याच प्रकारे रविवारी मंगल शारदा कॉलनी ते लक्ष्मी नारायण नगर या भागातील जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली तसेच वाहतुकीच्या मागार्र्वर पाण्याचा फैलाव झाल्याने या भागातील नागरीकांना मार्गक्रमण करतांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या भागातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने रहिवाशांना महामार्गाचा अवलंब करून घर गाठावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

खासगी टँकरने पाणीपुरवठा
शहराच्या काही भागात सतत पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने खाजगी सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे खाजगी टँकरने पाण्याचा पुरवठा करून नागरीकांची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मधील सरस्वतीनगर, गडकरी नगर, शिवकॉलनी आदी भागात पाण्यासाठी नागरीकांची मागणी होताच सामाजिक कार्यकर्ते सारंग पाटील यांच्या खाजगी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आला.

लक्ष्मी नारायण नगरचा मार्ग झाला खडतर
शहरातील विविध विस्तारीत भागाप्रमाणेच लक्ष्मीनाराण नगर, मंगल शारदा कॉलनी आदी भागातील मार्ग दुरूस्तीअभावी खडतर झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर या भागातील नागरीकांना कठीण परीस्थितीचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागते तर काही रहिवाशांना खडतर मार्गाअभावी महामार्गाकडून आपले घर गाठावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दुचाकी घसरण्याच्या प्रकारात झाली वाढ
जलवाहिनीच्या गळतीमुळे व पावसाच्या पाण्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. परीणामी वाहनधारकांची वाहने चिखलयुक्त मार्गावरून मार्गक्रमण करतांना घसरण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामध्ये शालेय मुलांच्या वाहनांचा व सायकलींचा समावेश असल्याने पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमृत योजनेच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यांची डांबरीकरण रखडले असलेतरी किमान रस्त्यांची मुरूम टाकून डागडूजी करावी, अशी माफक अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत.