भुसावळात जलसंपदा मंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर्स पालिकेने हटवले !

0

भुसावळ : कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त भुसावळात शुक्रवारी जलसंपदा मंत्री येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भुसावळात राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी लावलेले बॅनर्स पालिकेच्या पथकाने गुरुवारी हटवल्याने भुसावळातील राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार संतोष चौधरी यांचे पूत्र तथा कृउबा सभापती सचिन संतोष चौधरी यांनी यावल रस्त्यासह जामनेर रस्त्यावरील दुभाजकांमध्ये इलेक्ट्रीक पोलवर हे बॅनर्स लावले होते. इलेक्ट्रीक पोलवर बॅनर्स लावण्यास मनाई असतानाही नियमांचे उल्लंघण केल्याने पालिकेने कारवाई केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

पोलिसांनी बॅनर्स लावण्यास केली होती मनाई
शहरातील दुभांजकांमध्ये असलेल्या इलेक्ट्रीक पोलवर बॅनर्स लावण्यास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्टपणे नकार दिल्यानंतर बुधवारी रात्री पदाधिकार्‍यांनी पालिकेच्या इलेक्ट्रीक पोलवर बॅनर्स लावले होते.

पालिकेच्या कारवाईने खळबळ
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी गुरुवारी सायंकाळी पालिकेच्या पथकाला पालिकेच्या इलेक्ट्रीक बॅनर्सवर लावलेले बॅनर्स हटवण्याचे आदेश दिल्यानंतर अग्निशमक बंबाच्या मदतीने उपमुख्याधिकारी महेंद्र कथोरे व दहा कर्मचार्‍यांच्या पथकाने जामनेर रोडसह यावल रस्त्यावरील बॅनर्स जप्त केल्याने शहरातील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

असा आहे प्रदेशाध्यक्षांचा दौरा
सकाळी जळगाव येथून चोपडा येथे 10.30 वाजता आगमन, दुपारी अडीच वाजता फैजपूर येथे आगमन, रावेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, भुसावळ येथे 4.30 वाजता आगमन, सायंकाळी सहा वाजता मुक्ताईनगर आगमन होईल.