भुसावळात जल्लोषात गणरायांचे आगमन

0

शहरातील 188 सार्वजनिक मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना ; दोन दिवस चालणार सजावट व देखाव्यांचे काम

भुसावळ- विघ्नहर्त्या गणरायाचे सोमवारी ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातील विविध सार्वजनिक मंडळांसह घरा-घरात जल्लोषात आगमन झाले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणरायाची मूर्तीचे मंडळांमध्ये आणण्यासाठी धावपळ सुरू होती तर भाविकांनी मूर्ती घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. आरास आणि पुजा खरेदीसाठीने बाजारपेठ फुलून लाखोंची उलाढाल झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर व बाजारपेठ हद्दीत 188 सार्वजनिक मंडळातर्फे श्रींची स्थापना करण्यात आली.

मुहूर्तावर गणरायांची स्थापना
गणपतीच्या आगमनानिमित्तत्त घराघरांमध्ये उत्साह जाणवला. सकाळपासूनच मुहूर्त शोधून भाविकांनी गणरायाची विधीवत स्थापना केली. शहरातील बाजारपेठेत भाविकांनी गर्दी केली होती. गणरायाची मुती खरेदीपासून मोदक, दुर्वा, पूजा, केळीचे खांब, फळे घेण्यासाठी भाविकांची लगबग होती. शहरातील गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून सुध्दा याची दखल घेण्यात आली, शहरात सकाळी आठवाजेपासूनच पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली. शहरातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी शहरातील बाजारपेठेसह विविध गणेश मंडळांना भेटी देऊन सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या पदाधिकार्‍यांना सूचना केल्यात तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनीही गणेश मंडळांना भेटी देत बंदोबस्ताची पाहणी केली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी बंदोबस्ताबाबत अधिकार्‍यांची बैठक घेत कर्मचार्‍यांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या.

188 मंडळांकडून श्रींची स्थापना
शहरात बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 90 तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 98 गणेश मंडळे असून एकूण एकूण 188 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींची मोठ्या भक्तीभावात सोमवारी स्थापना केली. सोमवारी शहरातील विविध शाळांनी गणरायाच्या आगमनासाठी उत्साहपूर्व वातावरणात मिरवणुका काढून श्रींची स्थापना केली. ढोल-ताशांच्या गजरासह लेझीम खेळत गणरायाची स्थापना करण्यात आली. यंदा विविध मंडळांनी देखावे सादर केले असून सजावट व आरासचे काम पूर्ण होण्यासाठी किमान एक वा दोन दिवसांचा अवधी लागणार आहे.

बाप्पांचे खडतर मार्गातून आगमन
शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतरही पालिका प्रशासनाने रस्त्यांची डागडूजी न केल्याने सोमवारी खडतर मार्गातून बाप्पांचे आगमन झाल्याने भाविकांसह नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. किमान श्री विसर्जनापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्यास डागडूजी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांनी भाविकांच्या अपेक्षा लक्षात घेता दखल घेण्याची गरज आहे.

आमदार सावकारेंकडेही गणरायाचे आगमन
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याकडेही श्रींची जल्लोषात सालाबादाप्रमाणे स्थापना करण्यात आली. आमदार संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी श्रींच्या मूर्तीचे पूजन करून आरती केली. याप्रसंगी आमदारांच्या आई सुशीला वामन सावकारे, मुलगा युगांक, मुलगी सुनिधी, बहिण सरला वामन सावकारे उपस्थित होत्या. पाच दिवसांचा उत्सव साजरा करून श्रींचे विसर्जन केले जाणार असल्याचे रजनी सावकारे म्हणाल्या.