उत्तरपत्रिका विलंबामुळे ताप्ती स्कूलमध्ये पालकांचा गोंधळ
भुसावळ- सीबीएसईमार्फत घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत शनिवारी शहरात 92 तर जिल्हाभरातील 15 तालुक्यातील 29 परीक्षा केंद्रावर एक हजार 54 परीक्षार्थींनी दांडी मारली. सुरळीत परीक्षा झाल्याचा दावा जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.खंडागडे यांनी केला. दरम्यान, शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये उशिरा उत्तर पत्रिका मिळाल्याने पालकांनी प्रचंड गोंधळ घातला.
शहरात 92 परीक्षार्थींची दांडी
शहरातील के. नारखेडे विद्यालयात 250 पैकी 42 परीक्षार्थींनी दांडी मारली तर ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये 226 पैकी 50 परीक्षार्थींनी दांडी मारली. दरम्यान, ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका विलंबाने मिळाल्याने पालकांनी शाळेच्या आवारात गोंधळ घातल्यानंतर प्राचार्या निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना 20 मिनिटे वाढवून दिले जातील, असे सांगितल्याने गोंधळावर पडदा पडला. या शाळेत विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्तर पत्रिकेत एक उत्तर पत्रिका कमी वाटत असल्याने दिलेल्या उत्तर पत्रिका परत बोलावून पुन्हा देण्यात आल्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने पालक संतप्त झाले. जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.खंडागडे यांनी भेट देऊन पालकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही, असे सांगितल्याने वाद निवळला.