नागरिकांच्या संतापामुळे अधिकाऱ्यांचा काढता पाय
भुसावळ: रेल्वेतर्फे आरपीडी रस्त्यावरील श्री संत गाडगेबा हायस्कूल ते जुन्या अकबर टॉकीज परीसरात भूमी अभिलेख अधिकार्यांच्या उपस्थितीत बुधवारपासून जागा मोजणीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास अधिकार्यांचे पथक समता नगरात आल्यानंतर मोजणीसाठी आलेल्या अधिकारी व स्थानिक नागरीकांमध्ये जोरदार वाद झाल्याने तणावाची परीस्थिती निर्माण होताच अधिकार्यांनी जागेवरून काढता पाय घेतला तर पोलिस प्रशासनानेदेखील शांततेचे यावेळी आवाहन केले.
जागा मोजणीस स्थानिकांचा विरोध
गुरुवार, 21 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास रेल्वेचे विभागीय अभियंता (विशेष कार्य) आर.एस.तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक विभागीय अभियंता मुख्यालय सावकारे, आयओडब्ल्यू जैन यांच्यासह इंजिनिअरिंग विभागातील मोजणी पथक, आरपीएफ अधिकारी व कर्मचार्यांचा फौजफाटा समतानगरात मोजणीसाठी दाखल झाला. मोजणीस स्थानिक नागरिकांनी विरोध करीत सदर प्रकरण औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात न्यायप्रविष्ट असून कुणीही जागेची मोजणी करू शकत नसल्याची बाजू मांडली तर 4 डिसेंबरपर्यंत ‘जैसे थे परीस्थिती’ ठेवण्याचे आदेश असल्याचे रेल्वे अधिकार्यांना बजावण्यात आली. यावेळी नगरपरीषदेचे विरोधी गटनेते उल्हास पगारे, माजी उपनगराध्यक्ष रमेश मकासरे आदींनीही यात मध्यस्थी करून रेल्वे अधिकार्यांना जाब विचारला. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही रेल्वे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने वाद वाढत जात असताना नागरीकांवर बळाचा वापर करून पांगविण्याचा प्रयत्नही रेल्वे प्रशासनाने केला मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व कर्मचार्यांनी धाव घेत यात मध्यस्थी केली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी चर्चा करू, असे आश्वासन देण्यात आले तर संतप्त झालेल्या नागरीकांमुळे शेवटी एका तासानंतर रेल्वे अधिकार्यांनी समतानगरातून काढता पाय घ्यावा लागला.
हा तर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
समता नगरातील जागेचे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रमांक 35112/2018 अन्वये न्यायप्रविष्ट असून या प्रकरणात जैसे थे रीस्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून गोरगरीब लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करीत आहे. समता नगरातील नागरीक या रेल्वे अधिकार्यांच्या कृतीबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे म्हणाले.