भुसावळात जुन्या पादचारी पुलाचा 20 मीटर लांबीचा भाग हटवला

0

रेल्वेने घेतला चार तासांचा ब्लॉक ; वाहतुकीवर परीणाम नाही

भुसावळ- रेल्वे स्थानकावरील जुन्या पादचारी पूलाचे तब्बल बाराशे टनावरील वजन सहाशे टन आणण्याचे काम सुरू असून मंगळवारी दुपारी 20 मीटर लांबीचा पूलाचा भाग शक्तीशाली महाबली क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला. दुपारी प्लटफॉर्म क्रमांक एक ऐवजी तीनवर गाड्या वळवण्यात आल्या मात्र यामुळे वाहतुकीवर परीणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जुन्या पादचारी पूलाची देखभाल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा पूल वाहतूकीसाठी बंद केला असून प्लॅटफार्म एकवरील गाड्यांसाठी रेल्वे प्रशासनाने 2.45 ते 6.45 या चार तासाच्या काळात ब्लॉक घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

चार तास रेल्वेचा ब्लॉक
मंगळवारी जुन्या पादचारी पूलाचा 20 मीटर अंतराचा भाग काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल्यानंतर प्लॅटफार्म एकवरील वाहतूक थांबवून ती प्लॅटफॉर्म तीनवरून वळवण्यात आली. प्लॅटफॉर्म एकपासून बसस्थानकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. मंगळवारी कामाप्रसंगी रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, रेल्वेचे कर्मचारी, ओएचई विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांचे मजूर यांची स्थानकावर गर्दी झाली होती. पूल काढला जाणार असल्याने मोठी महाबली क्रेन आणण्यात आली होती. यावेळी मंडळ अभियंता एम. एस. तोमर, स्टेशन डायरेक्टर जी.आर. अय्यर, आपीएफ निरीक्षक दिनेश नायर, राजेद्र देशपांडे यांच्यासह रेल्वेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.