भुसावळात टंचाईच्या झळा ; रेल्वे भागात एकवेळ पाणी

0

रेल्वेच्या बंधार्‍यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक ; भुसावळ पालिकेचा ‘जलखजिना’ आटला

भुसावळ- शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही टंचाईच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. तापीच्या बंधार्‍यातील पाणी संपल्याने भुसावळ शहराचा पाणीपुरवठा गेल्या 7 एप्रिलपासून विस्कळीत झाला असून हंडाभर पाण्यासाठी नागरीकांची पायपीट होत आहे तर दुसरीकडे भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातही पाणी प्रश्‍नाने गंभीर रूप धारण केले आहे. आजमितीला ग्रामीण भागातील चार गावांमध्ये पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे तर दुसरीकडे हे पाणी भुसावळ पालिकेच्या विहिरीतून उचलले जात असल्याने शहरवासीयांना मात्र पाणी मिळण्यास अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागत आहे. प्रशासनाने ग्रामीण भागासाठी पर्यायी ठिकाणाहून पाण्याची उचल करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, जंक्शन शहरातील रेल्वेच्या साठवण बंधार्‍यात अवघा तीन दिवस पुरेल इतकाच जलसाठा असल्याने रेल्वेने एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागात टँकरवर मदार
भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बोअरवेलसह विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंडारी येथे दोन टँकरद्वारे सहा ट्रीपा पाणीपुरवठा केला जात आहे तर महादेवतांडा येथे टँकरची एक ट्रीप, भुसावळ ग्रामीणमध्ये टँकरच्या दोन खेपा तसेच कन्हाळा बु.॥ येथे एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले.

भुसावळ पालिकेचा ‘जलखजिना’ आटला
भुसावळ शहराला पाण्यासाठी वरदान ठरणारी पालिकेची विहिर सातत्याने सुरू असलेल्या उपस्यामुळे आटली आहे. भुसावळ ग्रामीणमध्ये होणार्‍या टँकरने पाणीपुरवठ्यासाठी या विहिरीतील पाण्याची उचल केली जात असल्याने शहरवासीयांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे तर तब्बल 24 हजार लिटर क्षमतेचे टँकर या विहिरीवरून भरले जात असल्याने दिवसागणिक या विहिरीची जलपातळी खालावत आहे तसेच शहरातील विविध भागातील नागरीक तसेच नगरसेवकांचे टँकर येथे पाणी घेण्यासाठी येत असलेतरी मोठ-मोठे टँकरमध्ये येथे पाणी भरले जात असल्याने त्यांनाही पाणी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. प्रशासनाने या संदर्भात दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रेल्वे परीसरात आता एकवेळ पाणीपुरवठा
भुसावळ रेल्वेच्या साठवण बंधार्‍यात अवघ्या तीन दिवसाचा जलसाठा शिल्लक असल्याने रेल्वे कॉलन्या, रेल्वे वसाहती, रेल्वे अधिकारी निवासस्थाने येथे दररोज सकाळ आणि सायंकाळ ऐवजी आता केवळ एक वेळच पाणीपुरवठा केला जाणार आहे. साठवण तलावातील पाण्याची स्थिती पहाता, दोन्ही वेळ पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने रेल्वे प्रशासनाने एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरूवारी घेतला आहे. पूर्वी सकाळी एक तास तर सायंकाळी 50 मिनीटे पाणी सोडले जात होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.

पाण्याचा जपून व काटकसरीने करा वापर
रेल्वेच्या बंधार्‍यांची पाणी अवस्था पाहता रेल्वे प्रशासनाकडून एकच वेळ केवळ 40 मिनिटे पाणीपुरवठा केला जाईल. रेल्वे कर्मचार्‍यांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकावर येणार्‍या गाड्यांमध्ये नियोजनानुसारच पाणी भरले जाणार आहे तर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना पिण्यासाठी असलेल्या यंत्रणेला मुबलक पाणी दिले जाणार आहे. स्थानकावरील रेल्वे गाडी गेल्यावर स्थानकावरील नळांचा मुख्य व्हॉल बंद केला जात आहे.