भुसावळ : शहरातील मॉडर्न रोडवरील टपाल कार्यालयालगत असलेले हरी ओम इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही असा सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा माल चोरट्यांनी लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. फिरोज शेख अकिल गवळी (24, रा.जाम मोहल्ला, मशीदजवळ, भुसावळ) व रज्जाक उर्फ राजा शेख रहीम (28 रा.जाम मोहल्ला, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दुकानातील चोरीमुळे व्यापार्यांमध्ये पसरली होती भीती
शहरातील टपाल कार्यालयाजवळ असलेल्या हरी ओम इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान नो व्हेइकल झोनमध्ये येत असल्याने या परीसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी रात्री हे दुकान फोडले. चोरट्यांनी दुकानांमधून टीव्ही तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लांबवल्या. अत्यंत गजबजलेल्या मॉडर्न रोडवरील सुरेंद्र वासवानी यांचे दुकान चोरट्यांनी फोडल्याची माहिती मिळताच अनेक व्यापार्यांनी दुकानाकडे धाव घेतली व त्यांना धीर देत झालेल्या चोरीची माहिती घेतली. वासवानी शनिवारी दुकान उघडायला आले असता त्यांना शटर वाकवल्याचे दिसले. त्यांनी दुकान उघडून आतमध्ये पाहणी केली असता दुकानातील टीव्ही, हेडफोन, पेन ड्राईव्ह, ट्रिमर, स्पीकर अशा सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि साडेचार हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबवल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात दोन लाख 26 हजार 350 रुपयांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाय पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात होता.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोडख बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, नाईक रमण सुरळकर, रवींद्र बिर्हाडे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, कृष्णा देशमुख आदींनी केली.