भुसावळात ट्रकच्या धडकेत भाविक महिला ठार
भुसावळ शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ भल्या पहाटे अपघात
भुसावळ : देवदर्शनासाठी मंदिरात गेलेल्या प्रौढ महिलेला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवार, 31 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील गांधी पुतळ्याजवळील राज्य उत्पादन विभागाच्या कार्यालयाजवळ घडला. या अपघातात मीनाबाई मोहन अग्रवाल (55, मेथाजी मळा, भुसावळ) या भाविक महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली तर अपघाताला कारणीभूत असलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे.
भाविक महिलेचा जागीच मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, मेथाजी मळा भागातील मीनाबाई मोहन अग्रवाल (55) या सोमवारी सकाळी साडेसात वाजता नित्यनियमाप्रमाणे प्रभागातील मंदिरांमध्ये दर्शनार्थ गेल्या होत्या व दर्शन आटोपून जळगाव रस्त्याने घराकडे निघाल्या असताना यावलकडून जळगावच्या दिशेने निघालेला ट्रक (जे.के.21-0045) ने पाठीमागून त्यांना धडक दिल्याने व डोक्याला मार बसल्याने जागीच त्यांचा मृत्यू ओढवला. अपघाताची माहिती कळताच माजी नगरसेवक ललित मराठे, राहुल सोनटक्के, विक्की राजपूत, राहुल बागुल, आदींनी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना करण्यात आला तर शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.
ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल
अपघातानंतर ट्रक (जे.के.21-0045) चालक यशपाल बेलीराम (बलोट्रा चाक, सोनखा, जि.सांभा, जम्मू कश्मीर) हा ट्रक सोडून पसार झाला मात्र नंतर शहर पोलिसांनी त्यास अटक केली तर अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रकही शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अपघातप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात राहुल रमेश सोनटक्के (50, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार ट्रक चालक यशपाल बेलिराम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक नगरपालिका रुग्णालयात सकाळीच मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. मयत विवाहितेच्या पश्चात पती, मुलगा रोहित व विवाहित मुलगी असा परीवार आहे.