पित्याचा मृतदेह पाहताच मुलाने फोडला टाहो ; ट्रक चालकाला अटक
भुसावळ- दुचाकीने जात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील हवालदारास ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या सातार्यात घडली. या अपघातात रेल्वे सुरक्षा बलातील हवालदार असलेले राजेश एस.पारधे (गंगोत्री कॉलनी) हे जागीच ठार झाले तर अपघातानंतर ट्रक चालकासह क्लीनर ट्रक सोडून पसार झाले. अपघातानंतर काही वेळ या भागात वाहतूक ठप्प झाली होती. शहर पोलिसांना माहिती कळवूनही कर्मचारी नसल्याने अपघातानंतर 20 मिनिटांनी कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह वरणगाव येथे शवविच्छेदनासाठी हलवला. दरम्यान, संतप्त जमाव मारहाण करेल या भीतीने ट्रक चालकास क्लीनरने पळ काढला मात्र रात्री उशिरा शहर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली.
ट्रकची धडक ठरली काळ
भुसावळ डीएससी कार्यालयात हवालदार म्हणून कार्यरत असलेले राजेश एस.पारधे यांनी शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत आपले कर्तव्य बजावले व ते काही कामानिमित्त दुचाकी (एम.एच.19 डब्यू.1570) ने जात असताना यावलकडून जळगावकडे जाणारा ट्रक (जी.जे.12 बीडब्ल्यू.5442) ने पाठीमागून धडक दिल्याने पारधे हे खाली पडले तर याचवेळी ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने मेंदूचा चेंदामेंदा होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून पळ काढला तर अपघाताचे दृश्य पाहून उपस्थितांचेही मन हेलावले.
वाहतूक ठप्प ; पोलिसांची धाव
दुपारी चार वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आली मात्र यावेळी पोलिस ठाण्यात केवळ एकच महिला कर्मचारी असल्याने अपघातस्थळी गर्दी होवून काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली तर काही वेळाने शहर पोलिस ठाण्याच्या डीबी कर्मचार्यांनी धाव घेत वाहतूक नियंत्रीत केली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णवाहिकेतून वरणगाव येथे हलवला. रेल्वे सुरक्षा बलाला प्रसिद्धी माध्यमांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर एएससी राजेश दीक्षीत यांच्यासह डीआय समाधान गुरूचळ, पोलिस उपनिरीक्षक समाधान वाहुळकर, मिलिंद तायडे, राजू पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा, आज अंत्यसंस्कार
अपघातानंतर पसार झालेला ट्रक चालक मनाराम सुजाराम मेघवाल (35, रा.अकोट, जि.बाडमेर, जि.राजस्थान) यास शहर पोलिस ठाण्याचे शंकर पाटील, साहील तडवी, विजय पाटील, विनोद तडवी, रशीद तडवी आदींनी अटक केली असून अपघातप्रकरणी नगरसेवक राजेंद्र नाटकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत पारधे यांच्या मृतदेहावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असून गंगोत्री कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. मृत पारधे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परीवार आहे.