भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील रेल दुनियाजवळील रेल्वेच्या उड्डानपूलाजवळ रविवारी पहाटे 5.30 वाजता कंटनेर व ट्रकची समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातामुळे तब्ब्ल सात तास वाहतुकीची कोंडी झाली. क्रेनच्या सहाह्याने वाहने दुर केल्यावर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या अपघातात रेल्वेच्या जीर्ण झालेल्या पूलास मोठेच भगदाड पडले आहे. रविवारी पहाटे गोंदीयाकडून तांदूळ घेऊन मुंबईकडे जात असलेल्या माल ट्रक (एम.एच. 46 एफ.3592) पूलावर येत असताना समोरून भरधाव वेगात आलेला ट्राला (जी.जे.06 झेड 7415) यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ट्रालाच्या धडकेत ट्रक रस्त्यात आडवी झाली. पुलावरील अपघातामुळे साकेगावच्याही पलिकडे तर भुसावळ शहराकडे नहाटश चौफुलीच्या पुढेपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. रविवारी सकाळी नऊ वाजेनंतर क्रेनच्या साह्याने रस्त्यात आडवी झालेली ट्रक पूलावरच बाजूला करण्यात आली, त्यावेळी एकेरी वाहतूक पोलिसांनी सुरू केली. अपघातात कोणालाही लागले नसल्याने ट्रक चालक राधेशाम यादव (रा. सूलतानपूर, उत्तर प्रदेश) यांनी सांगितले. दुपारी 12.30 नंतर यामार्गावरील वाहतूक संपूर्णपणे सुरळीत झाली.