भुसावळात ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थिनी ठार

0

मैत्रीणीकडे जाताना अपघात ः आरोपी चालकाची जामिनावर सुटका

भुसावळ- मैत्रीणीकडे जात असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली. अंजली रमेशसिंग मीना (17, दहा बंगला, भुसावळ) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक वामन संपत अडांगळे (रा.सुनगाव गुट्टी, ता.नांदर, जि.बुलढाणा,ह.मु.नेमाडे कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

मैत्रीणीकडे जाताना अपघात
रेल्वेतील लोकोपायलट रमेशसिंग मीना यांची कन्या अंजली ही आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 सी.एल.5710) ने जात असताना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रवेशद्वाराजवळील सुभाष नगर कंडारी गावाजवळ जाणार्‍या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्‍या (क्रमांक एम.एच.19 बी.3888) च्या ट्रॉली (नंबर एम.एच.19 पी.9303) ची जबर धडक बसल्याने अंजलीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. उपचारार्थ हलवत असताना तिचा मृत्यू ओढवला. अंजली ही शहरातील केंद्रीय विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी होती तर कोटा येथे लवकरच शिक्षणासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. अपघात प्रकरणी रमेशसिंग लालसिंग मीना (44, नोकरी, रा.गांधी नगरजवळ, पॉवर हाऊसजवळ, राजस्थान, ह.मु.दहा बंगला, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी ट्रॅक्टर चालक वामन अडांगळेविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चालकाला पोलिसांनी अटक करीत ट्रॅक्टर जप्त केले तर आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहेत.