भुसावळात ट्रेलर कोसळला : क्लीनर ठार

0

रेल्वे उड्डाण पुलावरील घटना : चालक जखमी : ओव्हरटेक करून आलेल्या ट्रकला जागा देताना घडला अपघात

भुसावळ- समोरून ओव्हरटेक करून येत असलेल्या ट्रकला जागा देण्याच्या प्रयत्नात अवजड ट्रेलर रेल्वे पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात क्लीनर जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला. सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील रेल्वे उड्डाणपुलाखाली हा अपघात झाला. या प्रकरणी मयताचा सख्खा मावसभाऊ तथा ट्रक चालकाविरुद्ध शहर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातानंतर पोलिस निरीक्षकांची धाव
सूत्रांच्या माहितीनुसार, उडीसा येथून मुंबईकडे लोखंडी पट्टी घेवून निघालेला ट्रेलर (आर.जे.47 जीए 1342) हा भुसावळातील रेल्वे उड्डाणपुलावर आल्यानंतर समोरून भरधाव वेगात ओव्हरटेक करणारा ट्रक येत असल्याने त्यास जागा देण्यासाठी चालक राजू महावीर बेराव (23, कनोज खेकडी, जि.अजमनेर, राजस्थान) याने रस्त्याच्या कडेला ट्रेलर घेतला मात्र झोल गेल्याने ट्रेलर पुलाखाली कोसळल्याने क्लीनर राजू गोपाळ बेराव (23, कनोज खेकडी, जि.अजमनेर, राजस्थान) हा जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला. अपघाताचे वृत्त कळताच शहरचे प्रभारी निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्‍यांनी तसेच शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी धाव घेत जखमी चालकाला उपचारार्थ गोदावरीत हलवले. दरम्यान, अपघातप्रकरणी पोलिस कर्मचारी राजकिरण झाल्टे यांच्या फिर्यादीनुसार ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नागेश तायडे व सुपडा पाटील करीत आहेत.