अपघातानंतर डंपर चालक पसार : द वर्ल्ड स्कूलसमोरील घटना
भुसावळ- शिवपूर-कन्हाळा रोडवरील द वर्ल्डस्कूलसमोर शेतात जात असलेल्या माय-लेकांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने वृद्धेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर अज्ञात डंपर चालक पसार झाला असून तालुका पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. कमल प्रभाकर बोंडे (60, मूळ रा.किन्ही, ह.मु.तुकाराम नगर, भुसावळ) असे मयत वृद्धेचे नाव असून त्यांचा मुलगा सतीश प्रभाकर बोंडे या अपघातात जखमी झाला.
शेतात जाताना डंपरने उडवले
किन्ही गावचे मूळ रहिवासी असलेले बोंडे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून भुसावळातील तुकाराम नगराजवळ राहतात. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने कमल बोंडे या मुलगा सतीशसह दुचाकी (एम.एच.19 सी.एन.8023) ने किन्ही शिवारातील शेतात जात असताना समोरून येणार्या टाटा कंपनीच्या पांढर्या रंगाच्या डंपरने दुचाकीला जोदार धडक दिली. धडक ईतकी जोरदार होती की कमल बोंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर सतीश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक करेवार व सहकार्यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.