भुसावळात डंपरने उडवल्याने पादचारी जखमी

भुसावळ : भरधाव डंपरने पादचार्‍याला उडवल्याची घटना तहसील कार्यालयाजवळ गुरुवारी सकाळी घडली. अपघात होताच डंपर चालकाने पळ काढत शहर पोलीस ठाणे गाठले. झाले असे की, फकीरा गवळी हे गांधी पुतळ्याकडे पायी निघाले असताना पाठीमागून आलेल्या डंपर (क्र.एम.एच.28 बी.8130) ने धडक दिली. या अपघातात गवळी जखमी झाले. त्यांच्या डोळ्याजवळ, नाकाला लागले असून ओठ फाटला. अपघाताची माहिती मिळताच शहरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहायक फौजदार अनिल चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते, पोलिसांनी डंपर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केला. पोलिसांनी फिर्यादी होत चालक राजेंद्र भागवत कोळी (साकेगाव) व जितेंद्र बुधो कोळी (जोगलखेडा) यांच्या विरोधात विना परवाना वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी सोपान पाटील यांनी फिर्याद दिली. सहा.फौजदार मोहंमद अली सय्यद हे अधिक तपास करीत आहे.