भुसावळ- भुसावळसह वरणगावातील दोघांना डेंग्यूची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या दोघा रुग्णांवर शहरातील मातृभूमी चौकातील सनराईस हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अक्षय नरेंद्र भोळे (वय 23, माऊली नगर, भुसावळ) व अक्षद बापू चौधरी (21, अयोध्या नगर, वरणगाव) अशी या रुग्णांची नावे आहेत. दोघेही तरुण कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास होते मात्र गावी आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर रक्तचाचणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ.राहुल जावळे यांच्या देखरेखाली त्यांच्यावर औषधोपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रुग्ण आढळल्यास अहवाल पाठवण्याचे आवाहन
पालिका रूग्णालयातर्फे जून महिन्यापासून शहरात डेंग्यूचे सर्व्हेक्षण केले जात आहे. नागरिकांना, बाजारपेठेत व्यापार्यांना, सरकारी कार्यालयामध्ये डेंग्यूबाबत जनजागृती केली जात आहे. शहरातील सर्वच डॉक्टरांना आरोग्य विभागातर्फे पत्र देऊन डंग्यू अथवा डेंग्यू सदृष्य रूग्ण आढळल्यास तात्काळ अहवाल पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरीकांना ताप आल्यास त्यांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा , असे आवाहन पालिका दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी केले आहे.