पालिकेकडून प्रभावीउपाययोजनांची मागणी: नागरिक संतप्त
भुसावळ : शहरात डेंग्यूने थैमान माजवले असताना पुन्हा एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरीक संतप्त झाले आहेत. आठवडे बाजार गणपती मंदिराजवळील पासी वस्तीमधील अत्यंत गरीब कुटूंबातील कृष्णा रुपसिंग पासी (15) या बालकाचा रविवारी डेंग्यूसदृष्य आजाराने बळी गेला असून आतापर्यंत हा दुसरा बळी आहे. सोमवारी पासी समाजबांधवांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांना निवासस्थानी भेटून पासी कुटूंबाला पालिकेकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली.
आठवडे बाजार वस्तीतील रहिवासी कृष्णा रुपसिंग पासी हा बालक म्युन्सीपल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता. शुक्रवारी त्यास ताप आल्यानंतर खाजगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. डेंग्यूची सर्व लक्षणे दिसत असताना परीस्थितीअभावी या बालकाला खाजगी रुग्णालयात हलवला आले नाही तर रविवारी या बालकाची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यास दुपारी उपचारार्थ हलविल्यानंतर डॉ.राजेश मानवतकर यांनी मृत घोषीत केले. दरम्यान या बालकास डेंग्यूची तीव्र लागण झाल्याचा अंदाजही वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला. या बालकावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत कृष्णा हा मजूरी करून शाळा शिकत होता. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे. परिवारातील सर्व सदस्य मजूरी करुन चरितार्थ चालवितात. या प्रकरणी पालिकेकडून मृत कॄष्णा याच्या परीवारास आर्थिक मदत मिळावी, यासाठी पासी समाजबांधवांनी पालिकेचे कार्यालय गाठले मात्र मुख्याधिकारी करुणा डहाळे वा किंवा सक्षम अधिकार्यांसोबत भेट झाली नाही.