बाजारपेठ पोलिसांनी मध्यरात्रीच आवळल्या आरोपींच्या मुसक्या ; बिल देण्यावरून आरोपींनी घातला होता वाद
भुसावळ- जेवणानंतर बिल न देता हॉटेल मालकाशी हुज्जत घालून त्यांच्या खिशातील दोन हजार 700 रुपयांची रोकड लांबवणार्या कुविख्यात गुन्हेगार बाबा काल्यासह वसीम पटेल व सलीम शेख यांच्या बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या. राष्ट्रीय महामार्गावरील न्यू पंजाब खालसामध्ये गुरुवारी रात्री आरोपींनी वाद घालत लूट करून पळ काढल्यानंतर आरोपींच्या शोधात मोहिम राबवण्यात आली. तिघाही आरोपींच्या मध्यरात्रीच मुसक्या आवळण्यात आल्या. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बिल दिल्याने आरोपींनी केला वाद
महामार्गावरील न्यू पंजाब खालसामध्ये गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बाबा काल्यासह वसीम पटेल व सलीम शेख यांनी जेवण केल्यानंतर त्यांना बिल दिल्याने त्यांनी हॉटेल मालक सारंगधर पाटील यांच्याशी वाद घालत जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली व पाटील यांच्या खिश्यातील दोन हजार 700 रूपये बजबरीने काढून घेतले व दुचाकी (एम.एच.19 – 5860) वरून पोबारा केला. हॉटेल मालकाने पोलिसांना ही बाब कळवताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश शिंदे, उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहाय्यक फौजदार तस्लीम पठाण व प्रशांत चव्हाण, विकास सातदिवे, संदीप राजपूत यांनी माहिती जाणली.
मध्यरात्रीच आरोपींना अटक
बाजारपेंंठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केल्यानंतर महामार्गावरून तिघांना दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश शिंदे करीत आहेत.