भुसावळ । प्रतिनिधी । गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वादातून भुसावळात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या तरूणाचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असतांना बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या मागे वाद झाला. यात विकी हरी पाटील (वय १९, रा. रेल्वे लाईनजवळ, भुसावळ) या तरूणावर चाकूने वार करण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार तुजळापूर भवानी मंदिराजवळील रहिवासी गोलू सावकारे याने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जखमी अवस्थेत असणार्या विकी पाटील याला गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याला तेथे मृत घोषीत करण्यात आले.
दरम्यान, या घटनेमुळे भुसावळात प्रचंड खळबळ उडाली आहे. थेट पोलीस स्टेशनच्या मागेच खून झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तोवर संशयित आरोपी गोलू सावकारे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत होते.