भुसावळात तळीरामांना ‘कही खुशी, कही गम’ चा अनुभव

0

आठ वाईन शॉप पैकी तिघांना तर पाच पैकी दोन बियर शॉपीला परवानगी : ‘देशी’ च्या 12 पैकी सात दुकानांना परवानी मात्र अवघी चार दुकाने सुरू

भुसावळ : तब्बल 45 दिवसानंतरच्या ब्रेकनंतर मंगळवारी मद्य दुकाने खुली होणार असल्याने भुसावळातील तळीरामांच्या आनंदाला उधाण आले होते मात्र दुपारी साडेतीन वाजलेतरी वाईप शॉपमधून दारू विक्री सुरू न झाल्याने तळीरामांच्या आनंदावर विरजण पडले तर दुपारी बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील एका दुकानात दारू विक्री सुरू झाल्याचे कळताच तळीरामांची मोठी गर्दी केली मात्र अवघ्या काहीच मिनिटात वाढत्या गर्दीमुळे दुकान बंद करण्याची वेळ आल्याने तळीरामांना आल्या पावली घरी परत जाण्याची वेळ आली. दरम्यान, भुसावळात आठ वाईन शॉपपैकी तिघांना तर पाच पैकी दोन बियर शॉपीला तसेच देशीच्या 12 दुकानांपैकी सात दुकानांना परवानगी मिळाली असून त्यातील चार दुकाने सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भुसावळात तळीरामांचा झाला हिरमोड
वाईप शॉपची दुकाने सुरू होणार असल्याने तळीरामांना मोठा आनंद झाला असतानाच मंगळवारी सकाळी 9.30 वाजताच ते घराबाहेर पडले व त्यांनी वाईप शॉपभोवती चकरा मारण्यास सुरुवात केली मात्र पाहता-पाहता दुपारचे साडेतीन वाजले मात्र वाईन शॉप सुरू न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला तर बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील मद्य विक्रीचे दुकान सुरू झाल्याची माहिती कळताच मोठी गर्दी उसळली. सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळात आठ वाईन शॉप असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने नेमलेल्या निकषात केवळ तीन वाईन शॉपच बसत असल्याने व गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर विक्रेत्यांनी मद्य विक्री न करण्याचा निर्णय घेत मंगळवारी दुय्यम निरीक्षक कल्याण मुळे यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर तळीरामांचा मोठा अपेक्षाभंग झाला. दरम्यान, बुधवारी अन्य परवानगीप्राप्त वाईन शॉप सुरू होण्याची आशा आहे.

तळीरामांना ‘देशी’चा दिलासा
भुसावळात 12 देशी दारू विक्रीची दुकाने असून नव्या नियमानुसार त्यातील सात दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी मिळाली असलीतरी मंगळवारी चार दुकाने सुरू झाल्याने देशीप्रेमींनी या दुकानांवर गर्दी केल्याचे चित्र होते.

बिअर शॉपीवरही उसळली गर्दी
शहरात एकूण पाच बिअर शॉपी असून त्यातील दोनच बिअर शॉपीला परवानगी देण्यात आली असून या बिअर शॉपी उघडताच तळीरामांनी बिअर खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

शासन नियमाप्रमाणे वाईप शॉप सुरू होणे गरजेचे -अशोक नागराणी
शासनाच्या नियमाप्रमाणे वाईन शॉप सुरू होणे गरजेचे असून शासन परवानगी जेव्हा देईल तेव्हाच परमीटरूमदेखील सुरू होणार असल्याचे लिकर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अशोक नागराणी यांनी सांगितले.

दुकाने उघडणे अथवा न उघडणे हा दुकानदारांचा अधिकार
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आय.एन.वाघ म्हणाले की, निकषात बसत असलेल्या वाईप शॉप विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली असून दुकान उघडणे अथवा न उघडणे हा त्यांचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.