डाऊन भुवनेश्वर एक्स्प्रेसमधील घटना ; दंड भरण्यावरून वाद विकोपाला
भुसावळ- डाऊन भुवनेश्वर एक्स्प्रेसमध्ये दंड भरण्यावरून तिकीट निरीक्षकाशीच वाद घालत त्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी मुंबईच्या दोघा पिता-पूत्र असलेल्या प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या तिकीट निरीक्षकावर प्रवाशांनी हात उचलल्याने रेल्वेतील तिकीट निरीक्षकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
दंड न भरल्याने वाद विकोपाला
डाऊन 12879 भुवनेश्वर एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 5 मधील बर्थ क्रमांक 11 ते 14 वरून करणार्या प्रवाशांमधील सहा वर्षीय मुलीचे तिकीट न काढल्याने तिकीट चेकींग करणार्या पथकाने संबंधित प्रवाशांना दंड भरण्याची सूचना केली मात्र प्रवाशांनी दंड भरण्यास विरोध करीत तिकीट निरीक्षकाशी हुज्जत घातली. तिकीट निरीक्षक निसार अहमद मोईनुद्दीन खान (41, खडका रोड, भुसावळ) यांच्यावर संशयीत आरोपी व प्रवासी व व्यवसायाने ट्रॅव्हल्स चालक असलेले राजेंद्र श्यामसुंदर राऊत (41) व त्यांचा मुलगा सिद्धार्थ राजेंद्र राऊत (19, दोन्ही रा.सांताक्रुंझ कलिना चर्च, 702, मुंबई) यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करीत धमकी देत निसार अहमद यांच्या कानशीलात मारली. यावेळी दोघाही प्रवाशांना भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आल्यानंतर त्यांना लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अलका आढाळे करीत आहेत.