भुसावळ- शहरात गत आठवड्यात सुरभीनगरातील कोठारी दांम्पत्यांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खळबडून कामाला लागली होती तर त्यानंतर शहरातील सिंधी कॉलनीतील तिघांना पुन्हा डेंग्यूची लागण झाल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. तिघाही तरुणांना सोमवारी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यांना झाली डेंग्यूची लागण
शहरातील सिंधी कॉलनीतील सुमित शोबराजमल लुल्ला (24), आकाश उर्फ गोलू रामचंद शामनानी (18) व सागर जयरामदास कुकरेजा (23) या तिन्ही तरुणांना गेल्या चार दिवसांपासून ताप होता. अशक्तपणा असल्याने त्यांना सोमवारी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तिन्ही तरुणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. यामुळे सिंधी कॉलनीसह शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात सुरभीनगर भागातील दिलीप मांगीलाल कोठारी (वय 60) व त्यांच्या पत्नी लता दिलीप कोठारी (वय 55) यांना डेंग्यूची लागण झाली होती. दरम्यान, मंगळवारी सिंधी कॉलनीतील तिन्ही तरुणांच्या घरांच्या परीरसरासह सिंधी कॉलनीत कंटेनर सर्वेक्षण केले जाणार आहे. यासह पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून या भागात डेंग्यूच्या संदर्भात नागरीकांनी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील माहिती पत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे.