भुसावळात तीन गावठी कट्ट्यांसह चार जिवंत काडतूस पकडले

0

भुसावळ : शहर व बाजारपेठ व जळगाव गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत सहा आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडील तीन गावठी कट्ट्यांसह चार जिवंत काडतूस व एक चाकू बुधवारी दिवसभरात गोपनीय माहितीवरून पोलिसांनी जप्त केला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गावठी कट्टे आढळत असल्याने शहर शस्त्र विक्रीचे केंद्र ठरू पाहत तर नाही ना ? असा प्रश्‍न उपस्थित करण्यास वाव आहे. मंगळवारी रात्री गुन्हे शाखेने एका आरोपीकडून चार जिवंत काडतूसासह कट्टा पकडल्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा शहर व बाजारपेठ पोलिसांनी तीन कट्टे जप्त केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकाच दिवसात सहा आरोपी जाळ्यात
भुसावळ शहर पोलिसांनी नवीन सुरेश लोखंडे याच्या ताब्यातून गावठी कट्टा जप्त केला तर राहुल उर्फ बाळा डिगंबर सोनवणे याने दिलेल्या माहितीवरून निलेश चंद्रकांत ठाकूर व निखील सुरेश राजपूत यांच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त केले तसेच बाजारपेठ पोलिसांनी शुभम पचेरवाल याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केले तसेच विक्रांत उर्फ विक्की तायडे याच्या ताब्यातून लोखंडी चाकू जप्त केला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुका निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली  जळगाव गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक नाईक, सायबर क्राईमचे उपनिरीक्षक अंगद नेमाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र पाटील, चिंचोले, दीपक मेढे, नरेंद्र वारूळे, जळगाव शहर पोलिस ठाण्याचे हवालदार सहिल तडवी, मो.वली सैय्यद, संजय पाटील, सुनील सैंदाणे, जुबेर शेख, सोपान पाटील, जितेंद्र सोनवणे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नाईक विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव, रमण सुरडकर, प्रशांत परदेशी आदींनी ही कारवाई केली.